शिवसेनेने केली दीपिकाची पाठराखण; संजय राऊत म्हणाले, छपाकला विरोध ही कोणती संस्कृती?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 02:17 AM2020-01-12T02:17:12+5:302020-01-12T02:17:45+5:30
कर्नाटकमध्ये तानाजी का उतरवला गेला? तिकडे सरकार कुणाचे? एक राज्य जिथे भाजपचे सरकार आहे तिथं तानाजी हा चित्रपट उतरवला जातो!
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये गेली म्हणून तिला देशद्रोही ठरवत तिच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे राजकारण करणे, गुंडगिरीने तानाजी सिनेमा उतरविणे हे तालिबानी संस्कृतीचे लक्षण असल्याची टीका शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, छपाकच्या आडून बहिष्कराचे राजकारण करणे, गुंडगिरीने चित्रपट उतरवणे यापेक्षा आणीबाणी सौम्य होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तुमची भूमिका पटली नाही म्हणून तुम्ही कुणाला देशद्र्रोही कसे ठरवू शकता. दीपिका फक्त जेएनयूमध्ये गेली, तिने भाषण दिले नाही, तेथील आंदोलनाला मूकसंमती दर्शविली. असे असताना तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भूमिका योग्य नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केली.
अमिताभ बच्चन यांच्या शहेनशाह या चित्रपट उतरवण्याचा प्रकार एकेकाळी झाला. कारण अमिताभ हे काँग्रेसमध्ये होते, ते राजीव गांधी यांचे मित्र होते. त्या घटनेवळी बाळासाहेब अमिताभ यांच्या पाठीशी उभे राहिले होते. आणीबाणीत, ‘किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट थांबवला म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे आज कुठे आहेत असा सवालही राऊत यांनी केला.
कर्नाटकमध्ये तानाजी का उतरवला गेला? तिकडे सरकार कुणाचे? एक राज्य जिथे भाजपचे सरकार आहे तिथं तानाजी हा चित्रपट उतरवला जातो! तानाजी आणि छपाक हे दोन्ही अप्रतिम सिनेमे आहेत. बेळगावात तानाजी बंद करणाऱ्या कर्नाटकातील भाजप सरकारकडे काय उत्तर आहे? जेएनयूच्या घटनाक्रमावर अनुराग सिन्हा, शबाना आझमी, अनुराग कश्यप अशा काही मोजक्या लोकांनी भूमिका घेतली. बाकीचे कुठे आहेत? अनुपम खेर आज कुठे आहेत ? सरकारच्या व्यासपीठावर असलेल्यांच्या दृष्टीने दीपिका पदुकोण कलावंत नाही? बाकीचे सगळे म्हणजे काय रिकामी डबडी वाटतात का या लोकांना? प्रश्न दीपिका किंवा ‘तानाजी’ चा नाही. प्रश्न या देशातल्या वातावरणाचा आहे. भाजपचे राज्य असलेल्या राज्यांत गुंडगिरीने ‘तानाजी’ उतरवला जातो, ‘छपाक’च्या बाबतीतही तेच घडतेय. पण हा देश या तालिबानी संस्कृतीला थारा देणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.