Uddhav Thackeray: “भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 05:19 IST2022-05-15T05:17:42+5:302022-05-15T05:19:19+5:30
काश्मिरी पंडितांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यात येत असलेले अपयश, वाढती महागाई यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ले चढविले.

Uddhav Thackeray: “भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा पुरता फाटल्याने त्यांचा भेसूर चेहरा समोर आला असून, विकृत, विखारी अन् गळेकापू राजकारण भाजप करीत असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील प्रचंड जाहीर सभेत केला. देवेंद्र फडणवीसांना मुंबई स्वतंत्र करायची आहे, तीच त्यांच्या मालकांची इच्छा आहे; पण तुमच्या मालकासकट कोणीही आले तरी हौतात्म्य पत्करून मिळविलेल्या मुंबईचे लचके तोडणाऱ्यांचेच तुकडे होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप, केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टीकेचे लक्ष्य केले. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घातलेला भाजप देशाला भरकटवण्याचे काम करीत आहे. काश्मिरी पंडितांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यात येत असलेले अपयश, वाढती महागाई यावरून भाजपवर हल्ले चढविले.
अटलबिहारी वाजपेयींचा भाजप आज राहिला नसून बदल्याच्या भावनेने कुटुंबाला बदनाम करण्यात तसेच सीबीआय, ईडी लावण्यातच त्यांचे हिंदुत्व खर्ची जात आहे. यावेळी मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, खा. संजय राऊत, गुलाबराव पाटील यांचीही भाषणे झाली.
भगवी शाल पांघरलेला मुन्नाभाई; राज ठाकरेंची उडविली खिल्ली
- काही लोकांना आता बाळासाहेब झाल्यासारखे वाटत असून, ते भगवी शाल पांघरून फिरत आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील मुन्नाभाईसारखा त्यांचा ‘केमिकल लोचा’ झाला आहे.
- असे मुन्नाभाई फिरताहेत. फिरू द्या, अशा शब्दात राज ठाकरेंचे नाव न घेता उद्धव यांनी टोला हाणला.
त्या सिनेमाच्या शेवटी ‘अपन के भेजे मे केमिकल लोचा होयेला है’ हे त्या मुन्नाभाईच्याच लक्षात येते असे सांगून त्यांनी राज यांच्या भूमिका बदलावर बोट ठेवले.
देवेंद्र, तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती
- बाबरी मशीद पाडली तेव्हा मी तिथे होतो, असे देवेंद्र तुम्ही म्हणता. त्यावेळी तुमचं वय किती होतं अन् तुम्ही किती बोलता.
- शाळेच्या सहलीला गेला होतात की काय?
- अहो! बाबरी पाडण्यासाठी तुम्ही एक पाय टाकला असता ना, तरी तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती, असा चिमटा उद्धव यांनी काढला.