मुंबई: आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) भोळे होते. त्यावेळी भाजपने बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी कसे फसवले हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी नाही म्हटले तरी थोडासा धुर्तपणे भाजपसोबत वागतो, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच उद्धव ठाकरेंनीही संधी मिळताच भाजपला सूचक इशारा देत सुनावले आहे.
मी भोळा नाही. माझे वडील भोळे होते. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवले आहे, पण हिंदुत्वाच्या आडून भाजप त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते, मी तसे करणार नाही. आम्ही वाईट कारभार करत असू तर जरूर आम्हाला जनतेसमोर उघडे पाडा. मात्र, भाजपाने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्न विचारला होता. आता त्यांना विचारण्याची गरज आहे की, महाराष्ट्राची संस्कृती पाहता भाजपाने महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय? ही सुडबुद्ध तुमच्यात कोठून आली, ही कोणती संस्कृती आहे, तुमच्या रक्तात सुडबुद्धी कशी आली, हा विकृतपणा तुमच्याकडे कसा आला?, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारले आहेत.
विकृत राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती
हे विकृत, सडलेले राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. निवडणुकीत लोक यांचा निर्णय करतील, पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांचा घाणेरडेपणा राजकारणात आणला, तर लोकच यांना जाब विचारतील, की कोठे नेताय महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाही. आमचा साधुसंतांचा, शिवरायांचा महाराष्ट्र असा नाहीये. असे सडके, नासके, सुडबुद्धीचे राजकारण मला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही. तेही कशासाठी तर केवळ मला पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, भोंग्याचा मुद्दा गाजलाय असे मला वाटत नाही. कारण, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे, तो निर्णय देशभर लागू आहे. गतआठवड्यात गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात एक बैठकही घेतली. त्यामध्ये असेच ठरले की, जसे नोटबंदी केली, लॉकडाऊन केले, हा निर्णय देशभर लागू केला होता. त्याचप्रमाणे भोंगाबंदीही देशभर करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भोंग्याचा चेंडू केंद्राकडे ढकलला आहे. या याचिकेतील निर्णयात केंद्र सरकार एक पार्टी होती, त्यामुळे केंद्र सरकारनेच हा निर्णय घ्यायला हवा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.