महापालिका देणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 01:11 AM2020-01-04T01:11:44+5:302020-01-04T01:11:53+5:30
अर्ज पाठवण्याचे आवाहन; बाळासाहेबांच्या जयंती दिनी वितरण
मुंबई : उत्कृष्ट कार्य करणारे प्रभाग समिती अध्यक्ष, सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी सहायक आयुक्त, प्रभाग समिती अध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १० जानेवारीपर्यंत आपला अर्ज पाठविण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रभाग समिती अध्यक्ष, सहायक आयुक्त, गुणवंत अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष (५० हजार रुपये), उत्कृष्ट सहायक आयुक्त (३० हजार रुपये), उत्कृष्ट गुणवंत अधिकारी (३० हजार रुपये), प्रत्येकी तीन उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी प्रत्येकी दहा हजार रुपये, तीन उत्कृष्ट गुणवंत कामगार प्रत्येकी पाच हजार रुपये इतक्या रोख रकमेसह स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी प्रभाग समिती अध्यक्षांनी महापालिका चिटणीस यांच्याकडे आपले अर्ज १० जानेवारी, २०२० पर्यंत सादर करावे, तसेच सहायक आयुक्त, गुणवंत अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या नावाच्या शिफारशीसह १० जानेवारी, २०२० पर्यंत सर्व सहायक आयुक्तांनी आपल्या क्षेत्रातील परिमंडळीय उपायुक्तांमार्फत सहआयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्याकडे हे अर्ज सादर करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार देण्याकरिता महापौर यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष, सहायक आयुक्त, गुणवंत अधिकारी, कर्मचारी व कामगार यांची अंतिम निवड करून महापौरांकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. २३ जानेवारी रोजी पालिका सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.