Join us

'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 12:11 PM

शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या तीन चार दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे वारंवार सांगत आहेत.

मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या तीन चार दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्यातच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास राज्यात सरकार जास्त काळ टिकणार नाही. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसातचं पुन्हा निवडणुका घ्यावी लागेल. त्यामुळे भाजपानं मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडू नये असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु शिवसेनेची ही मागणी धुडकावून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या तीन चार दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाचं होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा संपण्याची चिन्ह सध्यातरी दिसत नाही.

तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना जबाबदार राहणार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, भाजपाने मंगळवारी कोअर कमिटीची बैठक घेतली या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसराष्ट्रीय स्वयंसेवक संघआदित्य ठाकरे