ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त 'सामना'तून आदरांजली वाहण्यात आली असून आजच्या राज्यकर्त्यांवर टीकाही करण्यात आली आहे. ' शिवसेनाप्रमुखांनी कधीच छातीची उंची व माप सांगितले नाही, पण फक्त त्यांच्या नावाने पाकिस्तानसारख्या दुश्मनाचा थरकाप होत असे' अशा शब्दांत उद्धव यांनी पंतप्रधान मोदींनी चिमटे काढले आहेत. एवढेच नव्हे तर ' सध्या देशाची अवस्था निराश करणारी आहे. लोकांची मनं निर्जीव झालेली आहेत. राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे मनं मेली आहेत. लोकांना आता कशातच रस वाटत नाही. भरकटलेल्या देशाला शिवसेनाप्रमुखांचाच विचार मार्ग दाखवू शकेल' असेही अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे :
- आजच्या दिवशी काय बोलावे आणि काय लिहावे हा प्रश्नच पडतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. किमान पाच दशके आपण सगळेच शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस श्रद्धेने, भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करीत आहोत. ही परंपरा यापुढेही सुरूच राहील. शिवसेनाप्रमुख हे या भूतलावर अवतरलेले युगपुरुष आहेत आणि युगपुरुष हे अजरामर असतात. आज देशाची व महाराष्ट्राची परिस्थिती फारशी चांगली नाही. अनेक प्रश्न अचानकपणे असे निर्माण झाले आहेत की, लोकांना त्यांच्या लोकशाहीतच भरडून निघावे लागत आहे. लोकांच्या वेदनेवर कोणी बोलायचे नाही व सरकारी निर्णयांचे ढोल पिटायचे असे ठरले आहे. त्यामुळे लोकांच्या बाजूने परखडपणे बोलणारे शिवसेनाप्रमुखांचे स्मरण लोकांना पदोपदी होतच आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार हे नेहमी पक्के राहिले. लोकशाहीच्या नावाने जनतेची छळवणूक त्यांना मान्य नव्हती. हिटलरसुद्धा त्यांना पूर्णपणे मान्य नव्हता, पण देशासाठी धडपडणारा माणूस म्हणून तो त्यांना आवडत होता.
- आज काही लोक मोदींची तुलना हिटलरशी करतात, पण देशाला एका प्रामाणिक हिटलरची गरज आहे, जो फक्त सत्तेसाठी नाही तर देशाच्या कल्याणासाठी असेल, असे शिवसेनाप्रमुख सांगत असत. गोध्रा दंगलीनंतर ‘राजधर्म’ काय असतो हे ज्ञान देत अटलबिहारी वाजपेयी हे मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून बदलणारच होते, पण शिवसेनाप्रमुखांनी खणखणीत शब्दांत सांगितले, ‘‘मोदींना गुजरातमधून काढण्याची चूक करू नका. मोदी गेले तर गुजरातही जाईल!’’ असे विधान तेव्हा करणे धाडसाचे होते. मोदींवर दंगल भडकविण्याचे व नरसंहाराचे आरोप तेव्हा चारही बाजूंनी होत होते. मोदी यांना आधार व समर्थन देण्याचे काम तेव्हा एकमेव शिवसेनाप्रमुखांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या डोळय़ांत अपार माया, पण राष्ट्रासाठी मन पोलादी होते. त्यांनी आपल्या छातीची उंची व माप सांगितले नाही, पण शिवसेनाप्रमुखांच्या फक्त नावाने पाकिस्तानसारख्या दुश्मनाचा थरकाप होत असे. हिंदुस्थानातील धर्मांध शक्तीवर शिवसेनाप्रमुखांची अदृश्य जरब होती. शिवसेनाप्रमुख हे नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले, पण त्यांच्यावर ‘घात’ करण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. शिवसैनिकांनाच ते आपली कवचकुंडले मानीत. या कवचकुंडलांना भेदून माझ्यापर्यंत येणारी गोळी अद्यापि निर्माण झाली नाही असे ते आत्मविश्वासाने सांगत.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जगदंबेचा प्रसाद म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्याच हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना करणे हासुद्धा शिवसेनाप्रमुखांना मिळालेला आई जगदंबेचा प्रसाद होता. शिवसेनाप्रमुखांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केले. लोकसभा अध्यक्षपदापर्यंत शिवसेना पोहोचली. व्यक्ती संघटनेमुळे मोठय़ा झाल्या. व्यक्तीमुळे शिवसेना मोठी झाली नाही, असे सांगणारे ते सेनापती होते. हिंदुत्वाला भविष्य आहे हे सिद्ध करून दाखवणारे ते लोकनेते होते. ते तत्त्वांशी प्रामाणिक राहिले म्हणून देशाने त्यांच्यावर प्रेम केले. ‘‘मी बीजेपी ओळखत नाही, शिवसेना ओळखत नाही, मी हिंदुत्व ओळखतो. आज त्याची नितांत गरज आहे,’’ अशी जोरदार भूमिका शिवसेनाप्रमुखांनी २५ वर्षांपूर्वी मांडली होती. तिचा ज्यांना विसर पडला त्यांनी हिंदुत्वाशी एकप्रकारे द्रोहच केला आहे. बाळासाहेब जसे होते तसेच लोकांनी स्वीकारले. लोकांना ते देशाचे, महाराष्ट्राचे कर्तेपुरुष वाटले.
- शिवसेनाप्रमुखांनी अस्मितेची कवचकुंडले मुंबईभोवती निर्माण केली व मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान नेहमीच हाणून पाडले. मात्र भाषणाच्या शेवटी ते नेहमी ‘जय हिंद! जय महाराष्ट्र’ असेच खणखणीतपणे बोलत. या एका वाक्यातच शिवसेनेचे धोरण जगाला कळू लागले. पाकिस्तान, बांगलादेशी, आयएसआयचे हल्ले देशावर होणार असतील तर मला आमच्या जीविताचे रक्षण करण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी करणार. कोणत्याही मार्गाने मी तो करीन असे कणखर धोरण सांगणारा नेता शतकातून एकदाच निर्माण होतो. शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत तेच म्हणता येईल. सध्या देशाची अवस्था निराश करणारी आहे. लोकांची मनं निर्जीव झालेली आहेत. राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे मनं मेली आहेत. लोकांना आता कशातच रस वाटत नाही. जगण्यासाठी धडपडणं एवढेच राष्ट्रकार्य आता त्यांच्या नशिबी आलेले आहे. आपण कशाकरिता जगतो आहोत, कोणाकरिता जगतो आहोत याला काही दिशा राहिलेली नाही. भरकटलेल्या देशाला शिवसेनाप्रमुखांचाच विचार मार्ग दाखवू शकेल. शिवसेनाप्रमुखांचे स्मरण हेच राष्ट्रीय धोरण व्हावे! शिवसेनाप्रमुखांना मानवंदना!