दोन्ही बंधू पुन्हा अॅक्शन मोडमध्ये; उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधनला राज ठाकरे टक्कर देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:28 AM2022-08-23T10:28:22+5:302022-08-23T10:50:01+5:30
उद्धव ठाकरे लवकरच महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करणार आहेत.
मुंबई- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुखराज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे लवकरच महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करणार आहेत. तसेच राज ठाकरे देखील महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील गडातून होणार असून, जाहीर सभा टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमापाशी होणार आहे. सभेची तारीख जाहीर झाली नसली, तरी गणेशोत्सवानंतर होणाऱ्या या सभेबाबत ठाणेकरांमध्ये उत्सुकता आहे. शिवसेना स्थापना झाल्यानंतर पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
राज ठाकरेंवर हिप बोनवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर गेले दोन महिने राज ठाकरेंनी विश्रांती घेतली होती. मात्र सोमवारीच त्यांनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेत्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र दौऱ्याबाबत आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार आहेत.
मनसे अन् शिवसेनेची युती होणार?
राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साद घातली तर येऊ देत..मग बघू, असं उत्तर दिलं. शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर पुन्हा एका शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर देखील बाळा नांदगावकर यांनी भाष्य केलं आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरेच बोलतील, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.