Join us

युती झाल्याचं घरोघरी सांगा, देशावर फडकवू हिंदुत्वाचा झेंडा; उद्धव ठाकरेंचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 3:27 PM

२५ सप्टेंबर २०१४ रोजी युती तुटल्यापासून १८ फेब्रुवारी २०१९ ला पुन्हा युती होईपर्यंत, मधल्या १,६०६ दिवसांमध्ये भाजपा आणि शिवसेना भांड भांड भांडले.

ठळक मुद्देआता स्वबळाचे हे नारे अखेर हवेत विरलेत आणि युतीचे वारे वाहू लागलेत.उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांची बैठक घेतली.स्थानिक पातळीवर युतीसाठी ताकद लावण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

भाजपासोबत यापुढेही कुठलीही निवडणूक लढवणार नाही, शिवसेना स्वबळावरच मैदानात उतरेल, भगवा फडकवेल, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात ठिकठिकाणी केली होती. परंतु,आता स्वबळाचे हे नारे अखेर हवेत विरलेत आणि युतीचे वारे वाहू लागलेत. व्यापक जनहिताचा विचार करून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना हे जुने मित्र पुन्हा एकत्र आलेत. त्यामुळे आमची युती झालीय हे घरोघरी सांगण्याची जबाबदारी उद्धव यांनी आज जिल्हा आणि तालुका पातळीवरील आपल्या शिलेदारांवर सोपवली आहे.

२५ सप्टेंबर २०१४ रोजी युती तुटल्यापासून १८ फेब्रुवारी २०१९ ला पुन्हा युती होईपर्यंत, मधल्या १,६०६ दिवसांमध्ये भाजपा आणि शिवसेना भांड भांड भांडले. नोटाबंदी, जीएसटी, राम मंदिरासारखा मोठा विषय असो किंवा कुठल्या तरी जिल्हा परिषदेतील राजकारण; दोन्हीकडचे नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. त्यांच्यात शाब्दिक खटके उडत राहिले आणि दरी - दुरावा वाढत गेला. परंतु, निवडणुकांचे पडघम वाजू लागताच, झालं गेलं विसरून, भाजपा-सेनेनं युतीची तुतारी वाजवली आहे. त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांची बैठक घेतली. युतीमागची आपली भूमिका समजावून सांगत, स्थानिक पातळीवर युतीसाठी ताकद लावण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करणाऱ्या उद्धव यांनी आता हिंदुत्वाचा भगवा झेंडा लोकसभेवर फडकवण्यासाठी सैनिकांना साद घातली आहे. 

भाजपा-शिवसेना नेत्यांनी युतीचा निर्णय स्वीकारला असला, तरी कार्यकर्त्यांच्या मनात कुठे तरी किंतु-परंतु आहे. स्वबळाच्या नाऱ्यानंतर आणि नंतरच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला जोश थोडा कमी झाला आहे. शिवसेनेनं माघार घेतल्याची टिप्पणी पचवणं त्यांना जड जातंय. हे ओळखूनच, उद्धव यांनी जिल्हा आणि तालुकाप्रमुखांशी संवाद साधल्याचं समजतं. भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांची मनं जुळली आणि त्यांनी मिळून युतीसाठी प्रचार केला, तरच त्यांना अपेक्षित यश मिळवता येणार आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा