Join us

मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर? मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्र्यांचे कानावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 6:04 AM

मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहायक आणि त्यांच्या अत्यंत विश्वासातील मिलिंद नार्वेकर शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, आपण तिरुपती येथे बालाजी देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आलो आहोत. उद्या मुंबईत परत येऊ, एवढीच प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकर यांनी दिली. दसरा मेळाव्याला शिवसेनेतील काही आमदार आणि नेते शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 

मिलिंद नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिवसेनेत फूट पाडल्यानंतरही गणेशोत्सवात एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. त्यामुळे ते एकनाथ शिंदे  यांच्या गटात जाणार याबाबत चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती. 

नार्वेकर कुठेही जाणार नाहीत : नीलम गोऱ्हे

एखादी गोष्ट घडल्यानंतर आपण त्याबाबत भाष्य करू शकतो. मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, असे मला तरी वाटते. उगीच संभ्रम निर्माण करायचा, लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा हे योग्य नाही, असे शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राजकारणएकनाथ शिंदेमिलिंद नार्वेकरशिवसेना