Maharashtra Political Crisis: “केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:56 AM2022-08-17T07:56:30+5:302022-08-17T07:57:47+5:30

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असून, भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच यापुढे गुजराण करावी लागेल, असा घणाघात शिवसेनेने शिंदे गटावर केला आहे.

shiv sena chief uddhav thackeray criticised eknath shinde group and bjp over monsoon session through saamana editorial | Maharashtra Political Crisis: “केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”  

Maharashtra Political Crisis: “केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”  

googlenewsNext

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, पक्षाची मोट पुन्हा मजबूत करण्याचा निर्धार करत शिंदे गटावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. यातच नव्या शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचे पहिले अधिवेशन असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यातच शिवसेनेने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि महाप्रलयाचे सावट आहे. शेती, घरे, गुरेढोरे यांचे अतोनात नुकसान झाले. लोक वाहून गेले. घरसंसार वाहून गेले. पण शिंदे व फडणवीस गटाचे जे सरकार सध्या स्थानापन्न झाले आहे त्यांना राज्याच्या चिंतेपेक्षा स्वतःच्याच चिंतांनी ग्रासले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. पण या महोत्सवात महाराष्ट्राच्या वाट्याला अमृताचे दोन कण सोडाच. पण लाचारी आणि गुलामीच्याच बेड्या पडल्याचे दिसते.  भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच त्यांना यापुढे गुजराण करावी लागेल, असा हल्लाबोल शिवसेनेने आपले मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. 

सर्वोच्च मंत्रिपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे

एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रीपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकर्त्याने बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे दिसेल. राहिला विषय शिंदे गटाच्या बेइमान आमदार देत असलेल्या धमक्यांचा. हे धमकी बहाद्दर पादरे पावटे आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर चाल करून येणाऱ्यांचेच कोथळे बाहेर पडले व बोटे छाटली गेली. शिंदे गटाची बोटे छाटली जातील तेव्हा गुलामांचे मालक नवा घरोबा शोधण्यासाठी बाहेर पडतील, असा घणाघात शिवसेनेने केला आहे. 

महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरे यांचा हा अपमान आहे

मुळात खातेवाटपात शिंदे गटाची अवस्था ‘बुंद से गयी पर हौद से नही आयेगी’ अशी झाली आहे. फडणवीस हेच सरकारचे नेते आहेत. शिंदे गट ही तात्पुरती व्यवस्था आहे. शिंदे गटास ‘शिवसेना, शिवसेना’ म्हणून भाजप डोक्यावर घेऊन नाचत आहे. महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरे यांचा हा अपमान आहे. आधी मुंबई व नंतर विदर्भ तोडण्याच्या कारस्थानाचा हा भाग आहे. या पापात शिंदे गटाचे आमदार सामील होणे हा शिवरायांचा, सहय़ाद्रीचा अपमान आहे. पण खोक्यांच्या भांगेने बेधुंद व अंध झालेल्यांना हे कोणी सांगायचे. लोकभावना यांच्या बाबतीत तीव्र आहेत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

दरम्यान, ५० कोटींत आमदार विकला जातो. या बातम्या धक्कादायक आहेत. त्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय. हे ५०-५० कोटी आदिवासी भागातील आरोग्य सुविधांवर खर्च झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते. विधिमंडळात या सगळ्यांवर उठाव व्हावा. उठाव हा शब्द शिंदे गटास प्रिय आहे, म्हणून हे सांगणे. तूर्तास इतकेच! असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 

Web Title: shiv sena chief uddhav thackeray criticised eknath shinde group and bjp over monsoon session through saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.