मुंबई:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून पक्षाला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाला पाठिंबा वाढताना दिसत असून, शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाहीये. यातच आता दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्यावरून दोन्ही एक आमनेसामने आले आहेत. यावरून शिवसेनेने शिंदे गटाला चांगलेच सुनावले आहे.
जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे? असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. ५६ वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे. ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे, या शब्दांत शिवसेनेने शिंदे गटाचे कान टोचले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शिंदे गटाला इशारा देण्यात आला आहे.
लोकांनी प्रश्न विचारल्यावर नाइलाजाने खातेवाटप
महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत मऱ्हाटी जनता आहे. ‘ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते. यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. 38 दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले. खातेवाटपही अगदी नमुनेदार झाल्याने शिंदे गटात त्यावरूनही एखाद्या भानगडीची ठिणगी न पडली तरच नवल. नगर विकासचे मलिदा खाते सोडले तर शिंदे गटाच्या हाती भाजपने भोपळाच दिला आहे. सगळी प्रमुख खाती श्री. फडणवीस व त्यांच्याच लोकांच्या मुठीत. त्यामुळे नाक मुठीत धरूनच ‘त्या’ ५० जणांना फडणवीसांकडे जावे लागेल, पण खोक्यांखाली स्वाभिमान चिरडून गेला असल्याने हे सर्व ते सहन करतील! असा घणाघात शिवसेनेने केला आहे.
दरम्यान, आता या पन्नास जणांना काही ना काही हवे म्हणजे काय? फूल ना फुलाची पाकळी तरी म्हणे आपल्याला मिळावी, असे ते म्हणत आहेत. मग आता यातील फुले कोणास? पाकळी कोणाला व उरलेले काटे कोणाला मिळणार? हे प्रश्न आहेतच. या पन्नास जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे, पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार? आता मंत्रीपद हवेच. निदान महामंडळांचा बार तरी उडवाच. नाही तर या क्रांतीचा फायदा नाही, असे शिंदे गटाचे लोक उघडपणे बोलू लागले. शिंदे गटाचे मंत्री जिथे जातील तिथे निदर्शने होत आहेत. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तेथे ट्रकभर फुले त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी व लफडी करून आले असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण? असा सवालही शिवसेनेने केला आहे.