Join us  

Maharashtra Political Crisis: निष्ठेचे सोने झाले! शिवसेनेत मेगा बदल; उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांवर सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:23 AM

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीयपणे राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीति आखायला सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून अद्यापही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना बढती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले होते. त्यामुळे संबंधित नेत्यांची पदे रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

अरविंत सावंत, भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पराग लीलाधर डाके यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे. तर विधानसभेत आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या भास्कर जाधव आणि संसदेत शिवसेनेचा किल्ला लढवणाऱ्या अरविंद सावंत यांना नेतेपद देऊन दोघांचेही प्रमोशन करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे अनेक कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. या सगळ्याचा गुंता सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच या घटनापीठासमोर पहिली सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावेळी हे घटनापीठ कोणता अंतरिम निकाल देते, याकडे राजकीय वर्तळाचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळउद्धव ठाकरेअरविंद सावंतभास्कर जाधवशिवसेना