मुंबई- शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे जवळपास ३० ते ३५ आमदार उपस्थित होते. यावेळी तुम्ही तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा लढायचं आहे. आपली वारंवार बैठक होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही तुमचे आणि मतदारसंघातील मूळ प्रश्न सोडवणार, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना दिला.
तत्पूर्वी, राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेनं कधीच कोत्या मनानं वागलेली नाही. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
शिवसेनेतून १२ खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
१२ खासदार शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटातील नेत्यांशी चर्चा करु आणि त्यांना आगामी निवडणुकीत सहभागी करू, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.