मुंबई- शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे.
उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी घरोघरी जाऊन लोकांची कामे करा. मुंबईत ज्याप्रमाणे पक्षाचं काम सुरु आहे, त्याप्रमाणे इतर जिल्ह्यात देखील कामे सुरु करा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच लढाईसाठी तयार राहा, कोणताही विचार करु नका, असं सांगत आघाडी करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, असंही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
तत्पूर्वी, राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. ८ जुलै रोजी निवडणूक आयोगाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आयोगाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थापन झालेल्या बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, पंकजा मुंडे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती.
शिवसेनेतून १२ खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
१२ खासदार शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटातील नेत्यांशी चर्चा करु आणि त्यांना आगामी निवडणुकीत सहभागी करू, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.