Join us

Shiv Sena Dasara Melava: “जय्यत तयारी करा, न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा”; ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 6:05 PM

Shiv Sena Dasara Melava: दीड लाख शिवसैनिक जमवण्याची आखणी करण्यात आली असून, यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक करून उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena Dasara Melava: शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा दिलासा दिला. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. यातच उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी यंदाचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) ऐतिहासिक करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले जात आहे. 

शिवतीर्थावर दीड लाख शिवसैनिक जमवण्याची तयारी

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे.

दादर-प्रभादेवी परिसर भगवामय करण्यात येणार

दादर-प्रभादेवी परिसर भगवामय करण्याची जबाबदारी शाखा स्तरावर दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गट शिवाजी पार्क तर शिंदे गट बीकेसी एमएमआरडीए मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे दोन्ही मैदाने कार्यकर्त्यांनी तुडूंब भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहेत.  

दरम्यान, शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीची लढाई न्यायालयात जिंकल्यानंतर शिवसेनेला अखेर मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. यानंतर आता शिवसैनिक दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेने २० हजार रुपये अनामत रक्कम भाडे भरुन दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित केले आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना