मुंबई: अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेला आरेतील वृक्षतोडीचा मुद्दा कालपासून पुन्हा एकदा पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका काल फेटाळून लावल्या. त्यानंतर लगेचच संध्याकाळी आरेतील झाडं तोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा आरेचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत. तर शिवसेनेनं या प्रकल्पाला असलेला विरोध वारंवार बोलून दाखवला आहे.आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांनी आज धनगर, कुणबी, तेली, वंजारी समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आरेतील वृक्षतोडीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी अनेकदा विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका घेतली होती. आमचा विकासाला विरोध नाही, तर वृक्षतोडीला आणि पर्यावरणाच्या हानीला विरोध असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्री मात्र मेट्रोचं कारशेडचं आरेमध्ये उभारण्यावर ठाम आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक वेगवान होईल. जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोतून प्रवास केल्यावर प्रदूषण होईल, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Aarey Forest: 'आरे'ला 'का रे' करण्याची डरकाळी फोडणारे उद्धव ठाकरे आता म्हणताहेत 'बघू या रे'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:24 PM