Join us

Uddhav Thackeray Sabha: “अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 8:18 PM

Uddhav Thackeray Sabha: भाजपचा आणि मुंबईचा संबंध तरी काय अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले. यावेळी संजय राऊत यांच्यासाठी ठेवलेली राखीव खुर्ची आणि भाजप नेते तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत समाचार घेतला. 

अलीकडेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित शाह यांचा मुंबई दौरा झाला. यावेळी अमित शाह यांनी शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा केली होती. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित करताना पहिलाच पलटवार भाजपचे केंद्रीय नेतृत्व असलेल्या अमित शाहांवर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. तेव्हापासून महाराष्ट्रात आदिलशाह, निजामशाह असे अनेक जण आले आणि गेले. त्यातीलच एक हे अमित शाह आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू

शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा केली जात असेल, तर आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू. या ठिकाणी जमलेले सगळे शिवसैनिक जमिनीवर असलेली केवळ पाती नाहीत, तर ती तलवारीची पाती आहेत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असा उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. तसेच भाजपचा कमळाबाई असा उल्लेख करत, हे मी म्हणत नाही. तर बाळासाहेब ठाकरे यांनी कमळाबाई म्हटले होते, अशी आठवण सांगत कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ कुठे होता, अशी विचारणा करत मुंबई ही आमची मातृभूमी आहे, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली. 

दरम्यान, शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. संजय राऊतांवर बोलताना, सगळे मिंधे शिंदे गटात गेले आहेत. मात्र, संजय राऊत निष्ठेने लढत आहेत. मोडेन पण वाकणार नाही, हाच निश्चय त्यांचा आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी इथे राखीव खुर्ची ठेवलेली आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नमूद केले. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेअमित शाहमुंबई