मुंबई: एकीकडे संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Day 2022) साजरा केला जात आहे. मात्र, यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील समस्यांवर बोट ठेवत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच सडकून टीका केली आहे. ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ या अनीतीचा वापर करून हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले. देशातील विद्यमान सरकारही याच कुनीतीचा वापर करून राज्य कारभार करणार असेल तर त्याला स्वातंत्र्य कसे म्हणायचे? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव देशभरात अपूर्व उत्साह आणि धूमधडाक्यात साजरा होतो आहे. ७५वा स्वातंत्र्य दिन प्रत्यक्षात असला तरी गेल्या आठवडाभरापासूनच गल्लीपासून दिल्लीपर्यंत शाळकरी मुलांच्या प्रभात फेऱ्या आणि देशभक्तिपर गीतांचा गजर सुरू आहे. गेले काही दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंग्याचे वाटप सुरू होते. हे तमाम राष्ट्रध्वज आता घराघरांवर डौलाने फडकत आहेत आणि या उत्सवी सोहळ्यातून देशभक्तीचे एक दिमाखदार वातावरण नक्कीच निर्माण झाले. त्यात यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने या वेळच्या स्वातंत्र्य दिनाचा डौल काही औरच आहे. तो असायलाच हवा. मात्र, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करत असतानच देशासमोर आज जे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत त्यावरही मंथन व्हायलाच हवे, असा शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले असून, मोदी सरकारला अनेक कानपिचक्या दिल्या आहेत.
क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्याचा होम केला
स्वातंत्र्याचा हा मंगल कलश ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाला त्यांचे स्मरण करणे, त्यांचा गौरव करणे हेदेखील आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. पण ते आपण पार पाडतो आहोत काय? ज्या काँग्रेस पक्षाने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले त्याच काँग्रेस पक्षाला देशातून हद्दपार करण्याची घोषणा आज वारंवार दिली जाते, याला काय म्हणावे? काँग्रेस पक्षाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी सर्वाधिक संघर्ष केला, त्याच काँग्रेसला देशातून मुक्त करण्याचे नारे दिले जात असतील तर हा विद्वेषी विचार देशभक्तीच्या तराजूत मोजायचा तरी कसा? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
नवा इतिहास लिहिण्याचा सातत्याने प्रयत्न
असंख्य नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्याचा होम केला. या सर्वांच्या त्याग व बलिदानामुळे हिंदुस्थानला स्वातंत्र्याची फळे चाखता आली. तथापि, स्वातंत्र्यलढ्यातील काही नेत्यांचे योगदान नाकारायचे तर काही नेत्यांची सतत निंदानालस्ती व टिंगलटवाळी करायची व ज्यांचे स्वातंत्र्यलढय़ात योगदान नव्हते त्यांच्यावर मात्र देशभक्तीच्या स्तुतिसुमनांची उधळण करायची असा नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने होतो आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली.
दरम्यान, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ नंतरच मिळाले, अशी विकृत मांडणी करणारी मंडळी भविष्यात इतिहासाची काय आणि कशी मोडतोड करतील हे आजतरी कोणीच सांगू शकत नाही. केवळ इतिहासच नव्हे तर देशाच्या राज्यघटनेची, लोकशाहीची व प्रमुख सरकारी संस्थानांचीही हवी तशी मोडतोड आज सत्ताधाऱ्यांकडून होते आहे. आर्थिक आघाडीवर देशाची प्रचंड पिछेहाट होताना दिसते आहे. रुपयाचे विक्रमी अवमूल्यन होऊन तो रसातळाला गेला. विकास दरापासून ते जीडीपीपर्यंत सारे आलेख पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत. बेरोजगारीचा प्रचंड विस्फोट होतो आहे. चीनने हिंदुस्थानी हद्दीत मोठी घुसखोरी केली असतानाच हिंदुस्थानच्या सैन्यदलातून दोन लाख जवानांना घरी पाठवण्याच्या हालचाली सुरू असतील तर ते स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचेच लक्षण आहे, असा घणाघाती हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.