Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्ष वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसऱ्यांचे आमदार-खासदार चोरणं हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि भाजपासोबत सत्तास्थापन करणे या गोष्टींमुळे शिवसेना आणि भाजपसोबत आता शिंदे गटाशी संघर्ष वाढलेला दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर भाजपविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर ठाकरी शैलीत निशाणा साधला आहे.
काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे
चोरलेली वस्तू चोरबाजारात मिळते का बघा. तसे आता कुणी माणसे आमदार-खासदार गायब झाले, तर त्यांनाही तिथेच बघावे लागेल. स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. सगळे आमदार, खासदार, नेते, स्वप्न चोरायचे. मग तुमचा पक्ष आहे की चोरबाजार, अशी खोचक विचारणाही उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला केली. तसेच या कार्यक्रमात उपस्थित कुणीतरी ठाण्याचा उल्लेख करताच, ठाण्यामध्ये तर काही बोलूच नका. पण तिथेही कधीकाळी असे होते. मी लहानपणापासून ऐकलेय. मला कुतुहल होते. मला खरेच एकदा जायचे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजप राष्ट्रीय पक्ष नसून चोरबाजार असल्याचे म्हणत खिल्ली उडवली. दुसऱ्या पक्षातून आमदार-खासदार चोरणे हाच यांचा एककलमी कार्यक्रम झालाय. यांचा एककलमी कार्यक्रम आहे की दुसऱ्या पक्षातून नेते आणा. आमदार-खासदार आणा. तेही पुरत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्नंही पडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्नंही चोरा, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी सडकूल टीका केली.