मुंबई- लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. विरोधकांनीही राम कदमांच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम कदमांच्या आडून भाजपावर शरसंधान केलं आहे. ते म्हणाले, राम कदमांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यापुढे कोणत्याही पक्षानं त्यांना उमेदवारी देऊ नये, राम कदम, छिंदम आणि परिचारक हे एकाच माळेचे मणी आहेत. राम कदम, छिंदम आणि परिचारक यांना माफी देणं म्हणजे वाल्मिकींचा अपमान करण्यासारखं आहे. बेटी बचाव, बेटी पढावचा नारा बदलून भाजपानं आता बेटी भगाओचा नारा दिलेला दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी राम कदमांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी कदमांवर धाडस दाखवून कारवाई करावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
नोटाबंदीसारखा प्रकार पुन्हा झाल्यास देशात अराजक माजेल, यांना कारभार कळतो की नाय, लोक आपल्या देशात जिवंत आहे, हे यांना समजतं नाही काय?. पण आता पुन्हा नोटाबंदीसारखा प्रकार केल्यास जनता शांत बसणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावून सांगितलं आहे.
रघुराम राजन जर चुकीचे होते, तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परत का बोलावलं जातंय, तो व्यक्ती चुकीचा आहे, तर चुकीचाच आहे. त्या चुकीच्या व्यक्तीला तुम्ही कशाला परत बोलावत आहात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच सत्तेतून बाहेर पडण्याच्या पत्रकारांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याची तुम्ही वाट पाहू नका.
भाजपाकडून आम्हाला आता कशाचीच अपेक्षा राहिलेली नाही, सत्तेत राहून भाजपाकडून जनतेसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करून घेता येतील, त्या करून घेत आहोत. ज्या गोष्टी पटत नाहीत, त्यांना कडाडून विरोध करत आहोत. हार्दिकला उपोषणातून काहीही साध्य होणार नसल्याचं सांगितलं आहे. जनतेला आणि गुजरातला तुझी आवश्यकता असल्याचंही हार्दिकला सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.