'त्यांनी' आधी आपल्या बापांची नावं बदलावीत- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:09 AM2018-06-19T10:09:57+5:302018-06-19T10:09:57+5:30

मुंबईतील भागांची नाव बदलणाऱ्यांना शिवसेनेचा इशारा

shiv sena chief uddhav thackeray slams builder lobby for changing names of places in mumbai | 'त्यांनी' आधी आपल्या बापांची नावं बदलावीत- उद्धव ठाकरे

'त्यांनी' आधी आपल्या बापांची नावं बदलावीत- उद्धव ठाकरे

मुंबई: शहरातील अनेक भागांची नावं बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिल्डर लॉबीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे. ज्यांना नावं बदलून ‘बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं, असा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे बरसले. सध्या काहीजणांकडून मुंबईला नासवण्याचे कारस्थान रचलं जात असल्याचंही त्यांनी 'सामना'मधून म्हटलं. आज शिवसेनेचा 52 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्तानं शिवसेनेनं मुखपत्र सामनातून मुंबई आणि मराठी अस्मितेचा पुनरुच्चार केला आहे. 

पैसा आणि सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचं रुप बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मत अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. 'पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचं रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचं कारस्थान रचलं आहे. ‘बॉम्बे’चं मुंबई केलं याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावं परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावानं ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावं बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं,' अशा कडक शब्दांमध्ये शिवसेनेनं 'बिल्डर लॉबी'ला इशारा दिला आहे. 

याच अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपावरही निशाणा साधला आहे. 'देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणं व राज्य चालवणं मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे, तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्यानं त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं आहे.  
 

Web Title: shiv sena chief uddhav thackeray slams builder lobby for changing names of places in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.