Maharashtra Politics: एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू असताना, दुसरीकडे शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका करताना आई भवानीवर विश्वास असून, विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने दिग्गज वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर ठाकरे बोलत होते. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर नेऊन शिवबंधन बांधले. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजप, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि शिंदे गटावर शेलक्या शब्दांत निशाणा साधला.
आई भवानीवर विश्वास आहे, विजय आपलाच होईल
मला आई भवानीवर विश्वास आहे, विजय आपलाच होईल. आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कितीही अफझल खान आले, तरी मला पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झालीय. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. न्यायदेवतेवर आणि आई भवनाची माझा विश्वास आहे. दुर्गा भवानीच्या दर्शनाला येणार आहे. आपले कुठेही काहीही वाकडे झालेले नाही. भवनाची मातेची आपल्यावर कृपा आहे. खरे कोण आणि खोटे कोण, ते आपल्याला भवानी मातेने दाखवून दिले आहे. न्यायालयीन लढाई आपण जिंकू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे कारण कैलासने काय केले हे सर्वांना माहिती आहे. कैलासने काय पराक्रम केले ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. जालन्यात परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. ज्यांना खस्ता खाऊन तुम्ही मोठे केले. ते खोक्यात गेले. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता त्यांनी ठाकरेंनी खोतकरांवर टीका केली. इतकेच काय तर ईडी कारवायांवरुनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.