Uddhav Thackeray Interview: वन नेशन वन इलेक्शन कशासाठी? एकाचवेळी सर्वांना मूर्ख बनवण्यासाठी?- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 06:12 AM2018-07-25T06:12:12+5:302018-07-25T07:03:31+5:30
वन नेशन वन इलेक्शनवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
मुंबई: वन नेशन वन इलेक्शनवाले सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून निवडणुकीकडे बघताहेत का?, असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मोदींनी अनेक सभांमधून 'वन नेशन, वन इलेक्शन'वर भाष्य केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी झाल्यास मी ती संधी मानतो. मात्र वन इलेक्शनवाले त्याकडे सर्वांना एकाचवेळी मूर्ख बनवण्याची संधी म्हणून पाहतात का?, असा प्रश्न उद्धव यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारला.
'वन नेशन वन इलेक्शनकडे म्हणजे सगळ्या निवडणुका एकदम. आपल्याकडे म्हटलं जातं ना तुम्ही सगळ्यांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला सर्वकाळ मूर्ख बनवू शकता. पण सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. तर मग ज्यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आहे त्या सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून ते 'वन नेशन'वाले इलेक्शनकडे बघताहेत का? सगळ्यांना एकदा बनवू शकाल. सगळ्यांना परत परत मूर्ख नाही बनवता येत,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे 'वन नेशन वन इलेक्शन'साठी आग्रही असणाऱ्या मोदींवर बरसले.
वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना चांगली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 'वन इलेक्शन ही कल्पना चांगली आहे. ठीक आहे, पण सर्वांना एकदा मूर्ख बनवता येतं आणि ती संधी म्हणून कोण याकडे बघत असेल तर ते चूक आहे,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचारापासून दूर राहायला हवं, असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं. 'पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री हे प्रचारापासून दूर राहिले पाहिजेत. कारण मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून, मंत्री म्हणून तुम्ही सर्वांशी समानतेनं वागण्याची शपथ घेता. तुम्ही देशाचे पंतप्रधान असता. पक्षाचे पंतप्रधान नसता. तुम्ही जाऊन एखाद्या पक्षाचा जर प्रचार करणार असाल तर तो अपराध आहे लोकशाहीमध्ये,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.