Uddhav Thackeray Interview: मोदींनी एकदाच काय तो पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावावा- उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:41 AM2018-07-25T05:41:27+5:302018-07-25T06:58:04+5:30
काश्मीरबद्दलच्या मोदींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा निकाल लावून टाकावा. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. तशाच प्रकारे एक घाव दोन तुकडे करुन पाकिस्तानचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. जम्मू-काश्मीरमध्ये आपले जवान हकनाक शहीद होत आहेत. त्यापेक्षा एकदाच मोदींनी पाकिस्तानचा निकाल लावून टाकावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद, राम मंदिराची उभारणी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मोदींनी सत्तेवर आणलं. मात्र आजही हे प्रश्न कायम आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 'निवडणूक लढताना आपण जाहीर केलं होतं की पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाईल. म्हणजे कसं मला माहीत नाही... 'सर्जिकल स्ट्राईक' झाला तो पाकव्याप्त भारतात झाला, काश्मीरमध्ये झालेला आहे. तो पाकिस्तानात नाही केला आपण. तेसुद्धा गरजेचं होतं. तेसुद्धा कमी शौर्याचं नाहीये, नक्कीच नाहीये,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
आपण पाकिस्तानात घुसून जशास तसं उत्तर दिलंय का?, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला. 'काश्मीरमध्ये दहशतवादी घुसताहेत, गोळीबार होतोय, बॉम्ब किंवा हँडग्रेनेड्स फेकले जातायेत... काय होतंय... हे सगळं आपल्या देशात चाललंय. जशास तसं उत्तर म्हणजे त्यांच्या देशात घुसून उत्तर दिलंय का आपण आतापर्यंत? देण्याची ताकद, कुवत आणि हिंमत आहे का आपल्यामध्ये ?,' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या नेतृत्त्वावर आणि काश्मीरबद्दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.