आता सर्वोच्च वादावादी; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 05:44 AM2023-05-13T05:44:09+5:302023-05-13T05:47:16+5:30
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले.
लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले असून, आव्हान-प्रतिआव्हानांचे रण पेटले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत वेडावाकडा निर्णय घेतला, तर आमच्यासाठी कोर्टाचा दरवाजा मोकळा असेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यावर, अध्यक्षांवर असा दबाव आणणे योग्य नाही, तसे काेणी करीत असेल, तर ते फ्री अँड फेअर न्यायप्रक्रियेत बसत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.
उलटसुलट केले तर कोर्टात : ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे, तो निश्चल आहे. तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचे काम विधानसभाध्यक्षांकडे सोपविले आहे. अध्यक्ष त्यांच्या परीने निर्णय घेतीलच. पण त्यांनी जर काही उलटसुलट केले तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब व मी ज्यांना भरभरून दिले त्या विश्वासघातक्यांनी अविश्वास दाखवावा हे मला चालणार नव्हते. मी नैतिकतेला जागून राजीनामा दिला. हिंमत असेल तर निवडणूक घ्या, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.
हा तर अध्यक्षांवर दबाव : फडणवीस
शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांना भाजपला नैतिकता शिकवण्याचा अधिकार नाही. वसंतदादांचे सरकार कोणी कसे पाडले इथपासून सुरुवात होईल. उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींचे फोटो लावून निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विचार सोडला, युती सोडली. ते कुठल्या नाकाने नैतिकता सांगतात, हे मला समजत नाही. त्यांना वाटत असेल निकाल त्यांच्या बाजूने आला तर त्यांनी ढोल बडवावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. विधानसभा अध्यक्ष स्वतः निष्णात वकील आहेत. योग्य सुनावणी घेऊन योग्य वेळेत ते निर्णय देतील.
जे केले ते कायद्याच्या चौकटीत : मुख्यमंत्री
इसरूळ (जि. बुलढाणा) : वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे भूषण आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळाला होता. आता त्यांचे परमभक्त संत श्री चोखोबाराय यांच्या मंदिराचे लोकार्पणाबरोबरच त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. गेली काही महिने काय होईल, याचीच चर्चा होती; पण जे काही केले ते घटनेच्या चौकटीत राहून कायदेशीर केले. त्यामुळे निकालही या भक्ताच्या बाजूने लागला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
निकाल संभ्रमात टाकणारा : राज
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा आहे. निकालात सांगितले की, सर्व प्रकिया चुकली. मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव त्या गटाकडे दिलंय, त्याचे काय होणार, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
लवकर निर्णय घ्या; अध्यक्षांना पत्र देऊ
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने घ्यावा. तसे पत्र आम्ही त्यांना देणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्र परिषदेत दिली.