Join us

उद्धव ठाकरेंनंतर रश्मी वहिनींची फोनवरून चर्चा; पण, एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 7:51 PM

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या फोनवरून संवाद साधल्यानंतरही एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेकडून रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांनी सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, यादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे रातोरात सूरत येथे पोहोचले. ही बातमी येताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. दिवसभर नानाविध माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच रश्मी ठाकरे यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा

रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा, असे सांगत एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणे झाले. 

तुम्ही तुमचे ठरवा, मी माझे ठरवतो

तुम्ही तुमचे ठरवा, मी माझे ठरवतो. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढले असे का केले? या संवादात एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढले का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतात. भूमिका मांडायची मग मुंबईत या असे बोलत आहेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळे का बोलतायेत असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.  

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना