Join us  

Maharashtra Politics: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही? ठाकरेंकडून मैदानांसाठी शोधाशोध! MMRDAला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 6:01 PM

शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आग्रही असल्याने शिवसेनेने पर्यायी जागांचा शोध सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिंदे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास आग्रही आहे. यातच गेली अनेक दशके सुरू असलेली दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केलेला आहे. असे असले तरी आता शिवसेनेकडून अन्य पर्यायांची चाचपणी सुरू असून, उद्धव ठाकरेंनीएमएमआरडीएला एक पत्र दिल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्कच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा होणार की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्, शिवतीर्थावर परवानगी मिळाली नाही, तर बॅकअप म्हणून ठाकरेंनीही अन्य जागांची चाचपणी केली आहे. वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीएच्या मैदानावर ठाकरेंचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मागणारे पत्र शिवसेनेने MMRDA ला पाठवल्याचे सांगितले जात आहे. 

MMRDA नगर विकास खात्याच्या अंतर्गत 

दसरा मेळावा बीकेसी येथे आयोजित करण्यात यावा यासाठी शिवसेनेकडून एमएमआरडीएला पत्र लिहिण्यात आले आहे. MMRDA ही सरकारी यंत्रणा नगर विकास खात्याच्या अंतर्गत येते. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यावतीने एकनाथ शिंदे सांभाळत असलेल्या नगरविकास खात्यालाच पत्र व्यवहार करण्यात आला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी शिवसेनेकडून पत्र लिहिण्यात आले होते. आता बीकेसी मैदानासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्र लिहिले आहे.

दरम्यान, आम्ही शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन ठिकाणी परवानगीसाठी अर्ज केला आहे. जिथे परवानगी मिळेल तिथे भव्य दसरा मेळावा होईल. त्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्यास आम्ही बीकेसी येथे मेळावा घेऊ, पण आमचे प्राधान्य शिवाजी पार्कला आहे. शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली, तर मेळावा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. शिवाजी पार्कबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे शिंदे गटातील शिवसेना आमदार भरत गोगावलेंनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएमएमआरडीएराजकारण