Join us  

'...तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही'; उद्धव ठाकरेंच्या विधानावर केसरकरांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 5:55 PM

उद्धव ठाकरेंच्या विधानावर आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई- माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलात, तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. तुम्ही करताय ते योग्य आणि आम्ही करतोय ते अयोग्य, असं होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बाळासाहेबांनी कधी युती केली असती का?, असा सवालही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. आता जी विधाने होत आहेत, त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असं मत देखील दीपक केसरकरांनी व्यक्त केलं.

एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा, ही आलेली संधी आहे. तुम्हाला आता एकच काम देतोय, ते म्हणजे नोंदणी. नोंदणीचे गठ्ठेचे- गठ्ठे घेऊन या, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांना घेऊन काम करा, असंही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेदीपक केसरकर शिवसेना