शिवसेनाप्रमुखांची जयंती प्रथमच शासकीय स्तरावर पालिका मुख्यालयात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:07 AM2021-01-25T04:07:12+5:302021-01-25T04:07:12+5:30
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या वतीने प्रथमच त्यांची जयंती साजरी ...
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या वतीने प्रथमच त्यांची जयंती साजरी करण्यात आली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी पालिका मुख्यालयातील महापौर दालनात असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुखांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला असून त्यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. तेव्हापासून शिवसेनेच्या वतीने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा ठराव २५ जुलै २०१९ च्या सभेत नगरसेवक किरण लांडगे यांनी मांडला होता. महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर तसेच राज्य शासनाच्या मान्यतेनंतर यावर्षीपासून प्रथमच शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महापालिकेत साजरी करीत असल्याचे महापौर यांनी सांगितले.
महापालिका मुख्यालयात बाळासाहेबांचा अर्धपुतळा बसवण्याची मागणी होत आहे. परंतु, सभागृहात पुतळा उभारण्यास जागा नाही. त्यामुळे पुतळा उभारण्याचा प्रस्ताव तूर्तास बारगळला आहे. महापौरांच्या दालनाबाहेर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावून जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. त्याप्रमाणेच आता बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे आदी मान्यवर उपस्थित होते.