मुंबई : शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दबाव वाढविला असून भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकसभा निवडणुकीपूर्वी चर्चेतच तसे ठरलेले होते असे त्यांनी शनिवारी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले. तथापि, मुख्यमंत्री आमचाच असेल असे भाजपने स्पष्ट केले.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शनिवारी मुंबईत झाली. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घ्या आणि सत्तेत ‘फिफ्टी-फिफ्टी’चा वाटाही घ्या, असा आग्रह आमदारांनी तिथे धरला. सत्तास्थापनेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमदारांनी उद्धव यांना दिले. शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर सांगितले की, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह जे जे ठरेल ते भाजपने लेखी द्यावे, अशी मागणी आमदारांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले की, प्रत्येकी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद आणि ‘फिफ्टी-फिफ्टी’ मंत्रीपदे असे अमित शहा व फडणवीस यांच्याबरोबरच्या बैठकीत ठरले होते. जे ठरले, त्यापेक्षा कणभरही जास्त आम्ही मागत नाही. त्याबाबत ते आम्हाला लेखी देतील अशी अपेक्षा आहे. जे ठरले, ते देणार नसतील तर आमच्याकडे अन्य पर्याय आहेत, पण मला ते पाप करायचे नाही.
मुख्यमंत्री पदाआडून मंत्रीपदांसाठी दबावमुख्यमंत्रीपदासाठी दबाव आणून उपमुख्यमंत्री पद, आणखी काही मंत्रीपदे आणि महत्त्वाची खाती पदरी पाडून घेण्याची शिवसेनेची खेळी असल्याचे मानले जाते. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच दाखविली आहे.
भाजपच्या प्रदेश प्रभारी खा. सरोज पांडे यांनी मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, सत्तावाटपाबाबत अध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या संकल्पपत्रातील आश्वासनांची आम्ही पूर्तता करु. मुख्यमंत्री भाजपचाच, हे पांडे यांचे विधान लक्षात घेता भाजपश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
शिवसेनेसोबत नाही : राष्ट्रवादीराज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पूर्णपणे फेटाळली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकार स्थापनेत आमच्या पक्षाची कोणतीही भूमिका नसेल. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल. राज्यात भाजप-शिवसेनेला सत्तेसाठी कौल मिळाला आहे; आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.नेता निवडीसाठी भाजपची ३० ला बैठकभाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक ३० ऑक्टोबरला मुंबईत होईल. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड केली जाईल हे स्पष्ट आहे. त्यांच्याच नेतृत्वात पक्षाने निवडणूक लढविली आणि १०५ जागा जिंकल्या.