Uddhav Thackeray: “राज्यपालांना विशेष धन्यवाद, २४ तासांत बहुमत चाचणीचे निर्देश दिले”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 10:03 PM2022-06-29T22:03:08+5:302022-06-29T22:03:47+5:30
Uddhav Thackeray: गेल्या दीड-दोन वर्षांपासून विधान परिषद उमेदवारांची जी यादी दिली ती मंजूर करावी, राज्यपालांबद्दलचा आदर वाढेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या ठाकरे (Maha Vikas Aghadi Govt) सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले. यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला धक्का देत याचिका फेटाळून लावली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला निधी देऊन आम्ही ते काम सुरु ठेवले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. या साऱ्या धबडग्यात तुम्हाला विसरणार नाही. मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यात बाळासाहेबांनी औरंगाबादला नाव दिले होते, ते संभाजीनगर नाव देण्यात आले आहे. तसेच उस्मानाबादला धाराशिव असे नाव दिले आहे. याचा मला आनंद झाला. पण वाईट एवढ्याचेच वाटले की, शिवसेनेचे या बैठकीला चारच मंत्री होते, बाकीचे तुम्ही जाणता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मला विरोध न करता, नामांतराच्या प्रस्तावाला मान्यता दिली. ज्यांनी हे करायला हवे होते, ते नामानिराळे राहिले, आणि जे विरोध करतील असे भासवले जात होते, त्यांनी पाठिंबा दिला. त्यांचे आभार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
२४ तासांच्या आत फ्लोअर टेस्ट देण्यास सांगितले
तसेच ज्या रिक्षावाले, पान टपरीवाल्यांना नगरसेवक, आमदार, खासदार बनविले ते मोठे झाले. ज्यांनी मोठे केले त्यांना ते विसरले. त्यांना जे जे देता येईल ते सर्व दिले. मातोश्रीवर सामान्य शिवसैनिक येत होते, ज्यांना दिले ते नाराज आणि ज्यांना दिले नाही त्यांचे प्रेम होते, असे सांगत राज्यपालांनी दिलेल्या निर्देशावर एक प्रकारे तीव्र नाराजी व्यक्त केली. आता फ्लोअर टेस्ट होणार आहे. राज्यपालांनी जो आदेश दिलेला आहे, त्याचे पालन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपण लोकशाहीचा मान राखला, २४ तासांच्या आत फ्लोअर टेस्ट देण्यास सांगितले. त्या राज्यपालांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, गेल्या दीड दोन वर्षांपासून विधान परिषद उमेदवारांची जी यादी दिलीय ती मंजूर करावी, आताही केली तरी चालेल, असा टोला खोचक उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान, ज्या शिवसैनिकांनी या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता, त्यांच्या रक्ताने तुम्ही रस्ते लाल करणार का?, एवढे नाते तोडले. कोणीही यांच्या अध्येमध्ये येऊ नका. लोकशाहीचा नवा पाळणा हलतोय. लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोश झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.