शिवसेना-आयुक्तांमध्ये वादाची ठिणगी शिवसेनेत अस्वस्थता, शिवसेना आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 07:07 AM2017-09-16T07:07:52+5:302017-09-16T07:08:14+5:30
महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना नागरी कामांचे उद्घाटन सोहळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांपासून मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनाही डावलण्यात येत आहे.
मुंबई : महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना नागरी कामांचे उद्घाटन सोहळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांपासून मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनाही डावलण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असून आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या कार्यक्रमांपासून महापौरांना दूर ठेवले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. गेल्या पंधरवड्यात घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. मात्र याबाबत कोणतीच माहिती महापौरांना दिली नव्हती. सायकल ट्रॅकचे सादरीकरण महापौरांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांना दाखविण्यात आले. जकात विभागातील कर्मचाºयांना इतर विभागात सामील करून घेताना लॉटरी पद्धत वापरू नये, असे महापौरांनी बजावले असताना आयुक्तांनी परस्पर लॉटरी पद्धतीचा वापर केला.
याबाबत शिवसेनेत तीव्र नाराजी असताना मंडर्इंमध्ये स्वच्छता सेवा अभियानाच्या कार्यक्रमापासून महापौरांना दूर ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वच्छता हीच सेवा हे अभियान शुक्रवारपासून राबविण्यात येत आहे. त्यामुळे संतापलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला. आयुक्तांच्या या मनमानी कारभाराविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
अविश्वास ठराव नियमानुसार
आयुक्तांची बदली मुख्यमंत्री करतात म्हणून त्यांना खूश करण्यासाठी पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास आयुक्त भाग पाडत आहेत. मुंबईचे महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत, त्यांचा अपमान म्हणजे मुंबईकरांचाच अपमान आहे. शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. तो नियमानुसार आणला जाईल, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
महापौरांचा कार्यक्रमावर बहिष्कार
स्वच्छता हीच सेवा-पंधरवडा अभियानाच्या कार्यक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ झाला. या कार्यक्रमाच्ंो निमंत्रण साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी फोनवरून दिले. मात्र निमंत्रण पत्रिका पोहोचली नव्हती. पालिकेने मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून कार्यक्रम ठरवून घेतला. एक दिवस आधी मला फोनवरून कळविण्यात आले, म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही. धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधारी म्हणून आयुक्तांनी आमच्याशी चर्चा करायला हवी, असा संताप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला.