मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९६ पासून पालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. पूर्वीचे महापौर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तेथील
शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख, पालिकेचे विविध समिती अध्यक्ष, नगरसेवकांना कळवत होते. नागरी समस्या घेऊन गेल्यावर तिकडच्या शिवसेना शाखेशी आधी संपर्क साधा, असे पूर्वीचे महापौर नागरिकांना सांगत होते. मात्र, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या एकला चलोरे कार्यपद्धतीबद्दल शिवसेना नगरसेवकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
महापौर आमच्या प्रभागात येणार याची साधी कल्पना आम्हाला नसते, पालिका प्रशासनाकडून महापौर आज येथे भेट देणार असल्याचे समजते. महापौरांनी शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांचा मानसन्मान ठेवला तर पालिका प्रशासन ठेवेल, असे शिवसेनेच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
के पश्चिम वॉर्डमधील जोगेश्वरी पश्चिम येथे १४० बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण नुकतेच महापौरांनी केले. यावेळी के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे उपस्थित होते. मात्र, पालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा या स्वतः प्रभाग क्रमांक ६१ चे प्रतिनिधित्व करतात आणि शिवसेनेच्या महिला विभाग संघटकही आहेत. मात्र, त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण पालिका प्रशासनाने दिले नाही, कार्यक्रमाला येत असल्याचे महापौरांनी कळवले नाही. शुक्रवारी महापौरांनी नेस्को कोविड सेंटरला भेट दिली होती. या कार्यक्रमाची माहिती राजूल पटेल तसेच प्रभाग क्रमांक ५४ च्या स्थानिक नगरसेविका व महिला विभाग संघटक साधना माने यांनाही नव्हती.
मुंबई काँग्रेसची प्रसिद्धी यंत्रणा आहे, भाजपची पालिकेत प्रसिद्धी यंत्रणा आहे. महापौर एकट्या प्रसिद्धी घेतात. मात्र, शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी प्रभागात सतत काम करत असूनही पसिद्धीपासून वंचित राहतात.
कांदिवली पूर्व ग्रोव्हेल मॉलमध्ये कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिमंडळ ७ मधील नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे नुकतेच महापौर व उत्तर मुंबईचे भाजप खा. गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते व कांदिवली पूर्व मतदारसंघाचे स्थानिक भाजप आ. अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत
लोकार्पण झाले. यावेळी फक्त शिवसेनेतर्फे युवासेना सरचिटणीस सिद्धेश कदम व स्थानिक शाखाप्रमुख उपस्थित होते. तर भाजपचे कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, आमंत्रण शिवसेनेचे विभाग क्रमांक १ चे विभागप्रमुख व आ. विलास पोतनीस, विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, मागाठाणेचे शिवसेना आ. प्रकाश सुर्वे, उत्तर मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांना महापौरांनी कळवले नाही, पालिका प्रशासनानेही कळवले नाही.
कोविड काळात महापौरच ठिकठिकाणी भेटी देत काम करत आहेत, असा मुंबईकरांची समज झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनीसुद्धा कोविडची पहिली व आता दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली, हे विसरून चालणार नाही.
आगामी पालिका निवडणुकीला आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी आहे. १९९६ पासून पालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. काँग्रेस तर स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा यापूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. त्यामुळे पालिकेत शिवसेनेची सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. त्यामुळे महापौरांनी एकला चलो रे ऐवजी शिवसेना नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना बरोबर घेऊन त्या त्या प्रभागांना त्यांनी भेटी द्याव्यात, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.
----------------------------------------------------