मुंबई : दिल्लीला जाणाऱ्या गो एअर कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी घडली. यावेळी वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेना नगरसेवकांसह 40 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
मुंबई विमानतळावरुन ड्डाण घेतल्यानंतर अर्ध्या तासानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण न करता कंट्रोल रुमशी संपर्क साधत विमान माघारी फिरण्याचा निर्णय घेतला होता. वैमानिकाने विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने फिरवले आणि मुंबई विमानतळावर इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्व प्रवाशी सुखरुप विमानातून बाहेर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवर राजधानी दिल्लीत कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी निघाले होते. मात्र, या घटनेनंतर सर्वजण दुसऱ्या विमानातून दिल्लीला रवाना झाले.