Join us

Maharashtra Political Crisis: “तिरंगाही शरमेने खाली झुकेल! भ्रष्ट नेत्यांना क्लिनचीट हेच मोदींचे ‘स्वच्छ भारत अभियान’”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 8:58 AM

Maharashtra Political Crisis: भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून भ्रष्ट स्वच्छ झाले. पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

मुंबई: आताच्या घडीला राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधक सातत्याने टीका करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत मोठा भाऊ असलेली शिवसेनाही गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकावर हल्लाबोल करत आहे. आताही हर घर तिरंगा मोहिमेपापासून ते मंत्र्यांना मिळत असलेल्या क्लिनचीटपर्यंतच्या विषयांवरून शिवसेनेने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून भाजपच्या घोटाळेबाजांना एक तर ‘क्लीन चिट’ मिळत आहे, नाहीतर हायकोर्टातून ‘दिलासा’ मिळत आहे. राजकीय विरोधकांच्या विरोधात खोटे पुरावे, खोटे गुन्हे निर्माण करायचे, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, पण स्वतःचे सगळे अपराध आणि घोटाळे ‘दिलाशा’च्या टोपीखाली झाकून ठेवायचे. मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हेच असेल तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल आणि भंगारात गेलेली विक्रांत युद्धनौका, शेकडो हुतात्मेही तडफडत राहतील. देशाला फसविणारे ठोस पुरावे मागत आहेत! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या ‘दिलासा’ घोटाळयाचा मुखवटा फाडायलाच हवा, अशी बोचरी टीका शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केली आहे. 

‘लॉण्ड्री’वाल्यांना साधे चौकशीलाही बोलवायला तयार नाहीत

फोन टॅपिंगचा गुन्हा रश्मी शुक्लांवरही दाखल आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीखोरीचा तपास करणारी ‘एसआयटी’ शिंदे-फडणवीस सरकारने बरखास्त केली. नवनीत राणा यांचे लकडावालांशी असलेले कागदोपत्री आर्थिक व्यवहार ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणातच मोडतात, पण केंद्रीय तपास यंत्रणा या ‘लॉण्ड्री’वाल्यांना साधे चौकशीलाही बोलवायला तयार नाहीत. ज्यांच्यावर खून, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी, आर्थिक घोटाळे व ईडीच्या चौकशा सुरू होत्या ते सर्व भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून स्वच्छ झाले आहेत, पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे. 

लोक भावनांचा इतका अनादर कधीच झाला नव्हता

सत्य, न्याय व लोक भावनांचा इतका अनादर कधीच झाला नव्हता. देशाला फसविणारे ठोस पुरावे मागत आहेत! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या ‘दिलासा’ घोटाळ्याचा मुखवटा फाडायलाच हवा विरोधीपक्ष ते करतील काय? असा सवाल करण्यात आला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळउद्धव ठाकरेशिवसेनाकेंद्र सरकारभाजपा