Maharashtra Political Crisis: “शिंदे-भाजप सरकारमध्ये ‘सुप्त ज्वालामुखी’; कधीही स्फोट होईल, लाव्हारसाचे चटके बसरणारच”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 08:58 AM2022-08-13T08:58:02+5:302022-08-13T08:59:13+5:30
Maharashtra Political Crisis: बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
मुंबई:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार यासंदर्भातही अद्याप निश्चिती नाही. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिंदे-भाजप सरकारवर घणाघाती टीका करत या नव्या सरकारमध्ये अनेक सुप्त ज्वालामुखी आहेत. त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो आणि त्याच्या लाव्हारसाचे चटके बसरणारच आहेत, असा मोठा दावा केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, यामध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळाली नसल्याची चर्चा होती. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडूही नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आजघडीला अनेक सुप्त ज्वालामुखी आहेत. हे ज्वालामुखी कधी फुटतील, हे सांगता येत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊन अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकार अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे, असे म्हटले आहे.
खातेवाटप लटकले आहे
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळणा 40 दिवसांनंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला ४० दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोऱ्या आहेत आणि त्या आतल्या-बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा ‘झटका’ देत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
‘कडू’ सत्याचे सरकारला ‘गुद्दे’
त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. अर्थात असे अनेक दुःखी आणि ‘सुप्त ज्वालामुखी’ शिंदे-फडणवीस सरकारात आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी दिला. शिवाय ज्या मुद्दय़ांसाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले आहे ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे ‘गुद्दे’ही सरकारला लगावले, असा टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.
दरम्यान, तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, या शब्दांत यातून निशाणा साधण्यात आला आहे.