Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या सात दिवसांत चीनसह जपान, अमेरिका, फ्रान्स, ब्राझिल, जर्मनी, हाँगकाँग, तैवान, इटली, दक्षिण कोरियात 10 हजारांवर लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवणे हाच कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय आहे. मनसुख मांडविय यांनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर निर्बंध घालण्याचे सुचवले. यावरून शिवसेनेने टीका केली आहे. उद्याच्या नववर्षाच्या स्वागताचे सोहळे, उत्सव, त्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण कसे करणार? भाजपचे राजकीय सोहळेही बिनबोभाट सुरूच असतात. त्यामुळे फक्त ‘भारत जोडो’ यात्रेवरच वाकडी नजर नको!, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढले आहेत. आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, भारत जोडो यात्रेत कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. प्रोटोकॉलचे पालन करणे जमत नसेल भारत जोडो यात्रा स्थगित करा. राहुल गांधी यांच्या यात्रेस शंभर दिवस पूर्ण झाले व यात्रेस जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. भारत जोडो यात्रेस कायद्याने, कारस्थानाने रोखता येत नसल्याने ‘कोविड 19’चा व्हायरस केंद्र सरकारने सोडलेला दिसतोय, असा मोठा आरोप शिवसेनेने केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ऐकले काय?
‘भारत जोडो’ यात्रेतील गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो ही भीती खरी आहे, पण तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक उसळला असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गुजरातेत बोलावून त्यांच्या सन्मानार्थ लाखो लोक गोळा करणारे तुम्हीच होता. कोरोना संसर्ग वाढतोय. अमेरिकेतून येणारे कोरोना घेऊन येतील ही भीती तेव्हा अनेकांनी व्यक्त केलीच होती. पण पंतप्रधान मोदी यांनी ऐकले काय? मग आताच कोरोनाचे असे राजकीय भय का वाटावे? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
केंद्र सरकार सावध झाले आहे व काही पावले उचलली
चीनमध्ये कोरोनाचा कहर माजलाय हे खरे; पण याच काळात गुजरात विधानसभा निवडणुका पार पाडल्या व अगदी मतदानाच्या दिवशी आचारसंहितेची ऐशी की तैशी करत पंतप्रधान मोदी हे ‘रोड शो’ करीत मतदान केंद्रावर पोहोचले. त्या आधीही गुजरातमध्ये जागोजागी मोदी यांचे भव्य ‘रोड शो’ झाले. भारत जोडो यात्रा स्थगित करावी असे सांगणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना हे गर्दीचे रोड शो कोरोना वाढवतील असे वाटू नये, याचे आश्चर्य वाटते, असा टोला लगावत, केंद्र सरकार सावध झाले आहे व काही पावले उचलली आहेत. चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना रोखण्यासाठी उपयुक्त वर्तनाचे पालन या पंचसूत्रीमुळे कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवणे आजवर शक्य झाले आहे. या लढाईत महाराष्ट्र अग्रेसर राहिला, असे शिवसेनेने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"