आतापर्यंत महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या शिवसेनेने एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बाजी मारली. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांचा तब्बल ५१ हजार २६९ मतांनी पराभव केला होता. कलाबेन डेलकर यांच्या रूपात शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरून पहिला खासदार लोकसभेत पोहोचला आहे. दरम्यान, या विजयानंतर बुधवारी कलाबेन डेलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
"आम्ही चांगल्या मतांनी विजयी झालो आहोत. उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आमचा हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री लवकरच दादरा नगर हवेलीत विजयी सभेसाठी येणार आहेत," अशी प्रतिक्रिया डेलकर यांनी दिली. "माझे वडील मोहन डेलकर हे हुकुमशाहीविरोधात होते, आम्ही ही लढाई जिंकली आहे. अभी तो ये शुरुवात है," अशी प्रतिक्रिया अभिनव डेलकर याने दिली.
दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कलाबेन यांचे औक्षण केलं. या भेटीच्यावेळी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, शिवसेना खासदार अनिल देसाई देखील उपस्थित होते.
कलाबेन यांना एकूण १ लाख १८ हजार ०३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार ७६६ मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचा उमेदवार याठिकाणी तिसऱ्या स्थानी राहिला. काँग्रेस उमेदवार महेशभाई धोडी यांनी ६१५० मते मिळाली.