दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? ठाकरे, शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:56 AM2023-10-24T05:56:06+5:302023-10-24T05:57:40+5:30

दोन्ही गटांनी लाखोंच्या सभांच्या नियोजनाची जोरदार तयारी केली आहे.

shiv sena dasara melava thackeray and shinde group show of strength will blow the election trumpet | दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? ठाकरे, शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? ठाकरे, शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : न्यायालयीन लढाईपाठोपाठ आता ठाकरे-शिंदे मंगळवारी खऱ्या अर्थाने मैदानात उतरणार आहेत. दसरा मेळाव्यानिमित्त आगामी लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांचे रणशिंगच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फुंकले जाणार आहे. दोन्ही गटांनी लाखोंच्या सभांच्या नियोजनाची जोरदार तयारी केली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. शिवसेना नावानंतर ही परंपरा कुणाची हा वाद रंगला आणि अखेर शिंदे गटासाठी आझाद मैदान आणि ठाकरे गटासाठी शिवाजी पार्क निश्चित करण्यात आले. आता गर्दी कुणाची जास्त होते, यासाठी दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. 

मराठा आरक्षण, ललित पाटील, दुष्काळ, सरकारी योजना यावरून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच सरकारने जनतेसाठी केलेल्या उपक्रमांची माहितीच सादर करणार आहेत. याशिवाय एखाद्या मोठ्या योजनेची घोषणाही होऊ शकते.

शिंदेंकडून बस, ठाकरेंकडून रेल्वे

दसरा मेळाव्यात ट्रॅफिकची समस्या होऊ नये यासाठी रेल्वेने या, असे आवाहन उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. शिंदे गटाकडून ५२०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘पक्ष ठाकरे, निशाणी ठाकरे’

शिवसेना ठाकरे गटाने दसरा मेळाव्यानिमित्त नवीन गाणे आणले असून ‘पक्ष ठाकरे, निशाणी ठाकरे’ असे बोल असणारे  हे गीत आज शिवाजी पार्कवर गुंजणार आहे.

सरसंघचालक काय बोलणार? 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन रेशीमबाग मैदान येथे मंगळवारी सकाळी ७:४० वाजता करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या  लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: shiv sena dasara melava thackeray and shinde group show of strength will blow the election trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.