शिवसेनेची पुन्हा स्वबळाचीच घोषणा? उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:38 AM2018-06-09T01:38:17+5:302018-06-09T01:38:17+5:30
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतल्यानंतरही शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा स्वबळाचाच नारा देण्याची शक्यता आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतल्यानंतरही शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा स्वबळाचाच नारा देण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जोवर विधानसभेतील जागावाटपाचा तिढा सुटत नाही, त्यात शिवसेनेला हवा तसा वाटा मिळत नाही, तोवर फक्त लोकसभेसाठी युतीची घोषणा करण्यास शिवसेना राजी नसल्याने आणि अजूनही भाजपासोबत चर्चेच्या फेऱ्या सुरूच राहणार असल्याने उद्धव ठाकरे या मेळाव्यात स्वबळाची घोषणा करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यातून शिवसेनेला आपल्या मागण्या रेटण्यासाठी भाजपावर दबाव कायम ठेवता येईल, अशी ही रचना असल्याचे मानले जाते.
अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर एकीकडे युतीबाबत सकारात्मकता दाखवतानाच शिवसेना, भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळाची चाचपणी करीत असल्याचे संकेत दोन्ही पक्षांचे नेते देत आहेत.
दरवर्षी १९ जूनचा शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंदमध्ये साजरा होतो. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी यंदा गोरेगावच्या नेस्को ग्राउंडची निवड केली आहे. त्याद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचा शिवसेनेचा हेतू आहे.
राज्यभरातील शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाºयांची या वेळी उपस्थिती असेल. शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, तालुकाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, मुंबईतील १२ विभागप्रमुख, सर्व उपविभागप्रमुख, २२७ शाखाप्रमुख असे सर्व मिळून सुमारे १० हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी या वेळी उपस्थित राहतील.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनी म्हणजेच २३ जानेवारीला वरळीत झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या केलेल्या घोषणेचाच यंदाही पुन्हा एकदा पुनरुच्चार होईल, अशी शक्यता शिवसेनेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पहिले लक्ष्य पदवीधर, शिक्षक
२५ जूनला होणाºया मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास उर्फ भाई पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघात प्रा. शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेने संधी दिली आहे. त्यासाठी २२७ शाखा, १२ विभागप्रमुख, खासदार, आमदारांना लक्ष्य केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातही संजय मोरे यांच्या माध्यमातून शिवसेनेने जोरदार लढतीची तयारी केली आहे.