Join us  

Maharashtra Political Crisis: “शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 5:25 PM

Maharashtra Political Crisis: मातोश्रीच्या वाटेला आदरणीय एकनाथ शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवना पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, तर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असे म्हटले आहे. 

दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले असून, पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांना साद घातल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही.तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का? मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?, अशी विचारणा दीपाली सय्यद यांनी केली आहे. 

एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही अन् उद्याही राहतील

यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये दीपाली सय्यद यांनी, एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव साहेब आणि शिवसेनेवर टीका करतील. तर त्यांना एवढंच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. शिंदे साहेबांनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. परंतू वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते. 

दरम्यान, काहीजण म्हणतात आदरणीय उद्धवसाहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले. यासर्व घटनेत शिवसैनिक हरला, त्याला कळत नाही की ही भूमिका शिवसेनेची किती. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवून शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र, असेही दीपाली सय्यद यांनी यापूर्वी सांगितले होते. 

 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळदीपाली सय्यदउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे