“हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:15 PM2022-06-23T19:15:42+5:302022-06-23T19:16:55+5:30

भाजपचे हिंदुत्व सत्तेसाठी की महाराष्ट्र हितासाठी? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

shiv sena deepali sayyad criticised bjp devendra fadnavis after eknath shinde revolt | “हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?”

“हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?”

Next

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, यावर शिंदे गट ठाम आहे. यानंतर या सगळ्यामागे भाजप असल्याचा दावा केला जात आहे. यातच आता हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का, अशी विचारणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील राजकीय घडामोडींवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला. एक ट्विट करत दीपाली सय्यद यांनी भाजपला काही थेट सवाल केले आहेत. हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी की महाराष्ट्र हितासाठी? अशी विचारणा करत, भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल, असा खोचक टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. 

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?

तसेच याआधी केलेल्या ट्विटमध्ये, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू, असे दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला २४ तासांचे अल्टिमेटम दिला असून, मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडा, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. 
 

Web Title: shiv sena deepali sayyad criticised bjp devendra fadnavis after eknath shinde revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.