Join us

काँग्रेसच्या मदतीने चार प्रभागांमध्ये शिवसेनेची भाजपाला मात; सेनेकडे १२ समित्यांचे अध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 8:31 PM

शिवसेनेकडे ९५ तर भाजपकडे ८३ संख्याबळ आहे.

मुंबई: महापालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी नऊ प्रभागांवर वर्चस्व असलेल्या भाजपला यंदा चार प्रभाग समित्यांवर पाणी सोडावे लागले आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षांच्या मतांमुळे शिवसेनेकडे तब्बल १२ समित्यांचे अध्यक्षपद आले आहे. 

शिवसेनेकडे ९५ तर भाजपकडे ८३ संख्याबळ आहे. त्यामुळे गेल्या वर्षी १७ पैकी नऊ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे तर शिवसेनेकडे आठ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद होते. मात्र या वेळेस विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीने शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे चार प्रभाग समित्या भाजपच्या हातून निसटल्या आहेत. शुक्रवारी उर्वरित पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. एम/पश्चिम’ प्रभागात भाजपचे महादेव शिवगण यांची बिनविरोध निवड झाली. ‘एम/पूर्व’ प्रभागात शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांची बिनविरोध निवड झाली. 

आर/दक्षिण’ प्रभागात भाजपच्या लिना पटेल–देहेरकर यांनी शिवसेनेचे एकनाथ हुडांरे यांचा १२ मताधिक्याने पराभव केला. आर/मध्य आणि आर/उत्तर' प्रभागात शिवसेनेच्या सुजाता पाटेकर यांनी भाजपच्या आसावरी पाटील यांचा पराभव केला. ‘एन’ प्रभागात शिवसेनेच्या स्नेहल मोरे यांनी भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांचा पराभव केला. एस/ टी प्रभागात समान दहा संख्याबळ असूनही भाजपचे एक मत बाद झाल्यामुळे शिवसेनेच्या दीपमाला बढे यांना विजयी घोषित करण्यात आले. 

- शिवसेनेकडे - पी उत्तर, के पूर्व, एच पूर्व/ एच पश्चिम, एफ उत्तर/ एफ दक्षिण, ए/बी/ई, जी दक्षिण, जी उत्तर, एम पूर्व, एल, आर मध्य / आर उत्तर, एन, एस/टी 

- भाजपाकडे - पी दक्षिण, के पश्चिम, सी/डी, एम पश्चिम, आर दक्षिण

एस/ टी प्रभागाचा निवडणुकीत गोंधळ- 

या प्रभागात शिवसेना-भाजपाचे संख्याबळ समान असल्याने चिठ्ठीद्वारे निर्णय होणार होता. मात्र भाजपाचे एक मत बाद असल्याचे जाहीर करीत महापौरांनी शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित केले. याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाउद्धव ठाकरेकाँग्रेसभाजपा