मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप एकाकी पडली. बुधवारी शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी मिळून भाजपला जोरदार दणका दिला. भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीचे काम तहकूब करण्यात आले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ७ महिन्यांनंतरच्या स्थायी समितीच्या बैठकीला ६४७ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी २७५ प्रस्ताव कोरोनाशी निगडित होते.स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भालचंद्र शिरसाट यांच्या सदस्यत्वाबाबत हरकत नोंदविली. विरोधी पक्षनेते रवी राजा तसेच सपाचे गटनेते रईस शेख यांनीही या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा दिला. दुसरीकडे भाजपची बाजू मांडताना गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेना मूळ समस्यांना बगल देत सुडाचे राजकरण करीत आहे, असे म्हणणे मांडले. तर अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्व सदस्यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करीत असल्याचे जाहीर केले. आता भाजप या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे.
कामकाज तहकुबीमुळे प्रस्तावांवर चर्चा नाही स्थायी समितीच्या बैठकीत ६४७ प्रस्ताव होते. यातील २७५ कोरोनाशी निगडित होते. हे सर्व प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र शिरसाट यांच्या मुद्द्यावरून अडीच तास केवळ गोंधळ सुरू होता. दरम्यान सभा तहकूब झाल्यामुळे प्रस्तावांवर चर्चा होऊ शकली नाही.