मुंबई-
दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाच पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं थेट मुंबई मनपाच्या जी-उत्तर कार्यालयात धडक दिली. महिना उलटून गेला तरी अद्याप परवानगी का दिली जात नाही? असा जाब पालिका अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ पालिका कार्यालयात पोहोचलं होतं.
"प्रशासनावर आमचा काडीचाही विश्वास राहिलेला नाही. २२ ऑगस्टला शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. महिना उलटून गेला तरी परवानगी देण्यात आलेली नाही. विधी खात्यातून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे परवानगी देत येत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण आम्हाला आता परवानगी मिळो न मिळो शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर जमणार आहेत", असं शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य म्हणाले. जी-उत्तर कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच कुठे?- वैद्य"एकनाथ शिंदे यांच्याकडून जर बीकेसीतील मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे आणि त्यांना परवानगीही मिळाली आहे. मग शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये होणार असेल तर आम्हाला शिवाजी पार्कवर परवानगी देण्यास काय हरकत आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच कुठे?", असं मिलिंद वैद्य म्हणाले.