Join us

गोखले पूल बंद असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा, शिवसेनेची वाहतूक पोलिसांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: June 15, 2023 5:13 PM

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याला उशीर होतो तसेच हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स देखील उशीरा जातात.

मुंबई - ७ नोव्हेंबर पासून अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज वाहतुकीसाठी पूर्ण बंद असल्यामुळे परिणामी विलेपार्ले (पूर्व) व अंधेरी (पूर्व ) मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होतो. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याला उशीर होतो तसेच हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स देखील उशीरा जातात. पार्लेकरांसाठी विलेपार्ले पूर्व पश्चिमला जोडणारा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल हा एकमेव रस्ता आहे.गोखले पूल बंद असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ वाढल्याने परिणामी पार्लेकरांची गैरसोय होते. 

या संदर्भात वाकोला वाहतूक डिव्हिजनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यादव यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने भेट घेतली आणि पार्लेकरांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महत्वाच्या सूचना लवकर अंमलात आणण्याची मागणी केली.

पार्ले टिळक शाळा, कॅप्टन विनायक गोरे जंक्शन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रमाबाई शाळा, सुभाष रोड, वोडाफोन सर्कल, पार्लेश्वर सर्कल येथे वाहतूक पोलीस वॉर्डन ठेवणे गरजेचे असल्याच्या सूचना त्यांना केल्या.तसेच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात मोटरसायकल पार्किंग केल्यामुळे चालणं सुद्धा गैरसोयीचे झाले आहे असे मुद्दे त्यांच्या लक्षात आणून दिले अशी माहिती विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी लोकमतला दिली.

यावेळी विलेपार्ले विधानसभा संघटक सुभाष कांता सावंत,नितीन डिचोलकर,उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार,विधानसभा समन्वयक जुईली शेंडे,आनंद पाठक, रितेश सोलंकी, उत्तम सुर्वे, जय मिश्रा हे उपस्थित होते. तुम्ही केलेल्या सूचना खूप महत्त्वाच्या असून यावर लवकरच यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन सुनील यादव यांनी दिले.

टॅग्स :मुंबई