मुंबई- मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगेन की, शिवसेना तुम्ही उभी केली नाहीय. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील, असंही रामदास कदम म्हणाले.
रामदास कदमांच्या या टीकेला शिवसेनेच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नसते, तर तुम्हाला किती पदं मिळाली असती, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच रामदासभाई तुम्ही खुल्या मैदानात भेटा, समोरासमोर बोलू, असं आव्हानही सुषमा अंधारे यांनी दिलं. त्यामुळे सुषमा अंधारेंच्या या टीकेला आता, रामदास कदम काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, रामदास कदम यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला. जगातला पहिला प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला. जसा कायदा केला तसं आदित्य टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाही तू काय करणार आहेस. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला याला खरी गद्दारी म्हणतात, असं रामदास कदम म्हणाले.