Join us

मंत्रिपद नको म्हणणारेच आमच्याकडे जास्त; शरद पवारांनी सांगितलं 'गृह'चं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 1:10 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटपासंदर्भात मंत्र्यांची बैठक झाली.

मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी झाला. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, 25 नेत्यांनी मंत्रिपदाची, तर 10 जणांनी राज्यमंत्रिपदाची  शपथ घेतली. एकीकडे, त्यावरून  नाराजीनाट्य रंगलं असतानाच, राजकीय वर्तुळाच्या नजरा खातेवाटपावर खिळल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, आज किंवा उद्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल असं सांगितलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटपासंदर्भात मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप निश्चित झाले असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवार यांना अर्थ व नियोजन खातं दिलं जाऊ शकतं, तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. गृहखाते हेही राष्ट्रवादीच्या पदरात पडणार आहे. त्यातच, शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना गृहखात्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गृहमंत्री पदाबाबत विचारले तर, हे पद घ्यायला शिवसेना नको म्हणाली, काँग्रेसही नको म्हणाली, असे पवार यांनी सांगितलं. तसेच, आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, असेही पवारांनी सांगितले.  

मंत्रीपदावरून राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाही, याउलट आमचेकडे मंत्रीपद नको म्हणणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. त्यामुळे मंत्रीपदावरुन नाराजीचा विषयच नाही, नगरमध्येही कोणीही नाराज नाही. ज्या तालुक्यात आतापर्यंत मंत्रीपद दिले गेले नव्हते अशा तालुक्यांना आम्ही प्राधान्य दिले आहे, असेही पवार यांनी सांगितले. तसेच, महाविकास आघाडीचा प्रयोग इतर राज्यांतही अनेकांना भावला आहे. त्यादृष्टीने आम्हाला इतर राज्यातून विचारणाही झाली आहे. समान कार्यक्रम घेऊन प्रादेशिक पक्ष पुढे येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे, असेही पवार यांनी म्हटले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनामुंबईअहमदनगरउद्धव ठाकरे