मनोहर कुंभेजकर, मुंबईभाजपाने महाराष्ट्र दिनी पालिका निवडणुकीचा बिगुल वाजवला असला तरी शिवसेनेने आधीपासून पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यात भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. राज्यात भाजपा शिवसेनेला सापत्न वागणूक देत असल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे भाजपाचा आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वचपा काढण्यासाठी आणि पालिकेत शिवसेनेला एकहाती सत्ता देण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सज्ज झाल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे ११५हून अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी चोख रणनीतीही आखण्यात येत आहे. वॉर्डांमधील ताळागाळातील नागरिकांपर्यंत नाळ जुळलेली तसेच त्यांच्या सुखदु:खात समरस होणारी शिवसैनिकांची मोठी फौज शिवसेनेकडे आहे. सध्या पालिकेत शिवसेनेचे ७८ नगरसेवक आहेत. तसेच १२ पुरुष विभागप्रमुख, १२ महिला विभाग संघटक, ७८ पुरुष उपविभागप्रमुख, ७८ महिला उपविभाग संघटक, २२७ पुरुष शाखाप्रमुख, २२७ महिला शाखा संघटक आणि सुमारे ९,०८० गटप्रमुख, माजी नगरसेवक, ज्येष्ठ शिवसैनिक अशी कार्यकर्त्यांची मोठी फौज हे शिवसेनेचे बलस्थान आहे. तसेच युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांचा देखील मोठा ताफा शिवसेनेकडे आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांची युती होणार नसल्याचे संकेत मिळत असल्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. अकार्यक्षम नगरसेवकांना मात्र हातात नारळ मिळणार असून, उमेदवारीचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईत जरी मराठी टक्का कमी होत असला तरी गुजराथी, बिहारी, उत्तर भारतीय, राजस्थानी अशा विविध समाजांचे नागरिक शिवसेनेशी मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत. दिंडोशी आणि गोरेगाव येथील शिवसेनेच्या उत्सव-मेळाव्यातून हे सिद्ध झाल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. नुकताच दक्षिण मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. शिवसेनेचे ज्या ठिकाणी नगरसेवक आहेत त्या ठिकाणी असलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि सध्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक नाही त्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक कसा निवडून आला पाहिजे, त्यासाठी देखील शिवसेनेने रणनीती आखल्याचे समजते. मनसे आणि इतर पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. ही संख्या अजून वाढणार असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली.शिवसेनेतर्फे उपनेते डॉ. विनोद घोसाळकर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर आणि विभागप्रमुख -आमदार अजय चौधरी यांनी शिवसेनेच्या २२७ शाखांना भेटी देऊन तेथील शाखाप्रमुखांशी सविस्तर चर्चा केली आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी शिवसेनाही ‘सैराट’
By admin | Published: May 14, 2016 1:30 AM