Join us

शिवसेना मराठीचं राजकारण करतेय, शोभाताईंच्या भूमिकेला आठवलेंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 3:42 PM

'फक्त मराठी बोलण्याची सक्ती हे संविधान विरोधी आहे. शिवसेनेत उत्तर भारतीय/ दक्षिण भारतीय विंग आहेत. ते सगळे मराठी बोलतात का?, असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला.

मुंबई - मराठी बोलण्यासर नका देत 75 वर्षीय महिलेला दुकानाबाहेर काढणाऱ्या सराफ दुकानदाराने अखेर माफी मागून आंदोलन मागे घेण्याची विनंती शोभा देशपांडे यांना केली. मराठीचा आग्रह धरत आंदोलन केलेल्या शोभा देशपांडे यांचे वृत्त मीडिया आणि सोशल मीडियात झळकताच, मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, या महिलेशी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला आहे. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी या महिलेच्या व शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध दर्शवला आहे.  

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतच अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस येतात. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. आज पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली होती. येथील महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने शोभा देशपांडे यांना मराठी बोलण्यास नकार देऊन महिलेस अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलिसांना बोलावून अपमानित केले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळ ५ वाजल्यापासून त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते. या महिलेच्या आंदोलनास मनसे, शिवसेना आणि महाराष्ट्रातून अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लेखिका शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. 

'फक्त मराठी बोलण्याची सक्ती हे संविधान विरोधी आहे. शिवसेनेत उत्तर भारतीय/ दक्षिण भारतीय विंग आहेत. ते सगळे मराठी बोलतात का?, असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला.  तसेच, मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही, शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला माझा विरोध, आहे असं म्हणत शिवसेना मराठी भाषेचं राजकारण करतेय, असेही आठवलेंनी म्हटले.

दुकानदाराने हात जोडून मागितली माफी

शोभा देशपांडेंच्या आंदोलनाचे वृत्त समजाताच मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कुलाबा गाठल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच, सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. मराठीजनांचा आग्रहापुढे अखेर गुजराती सराफ दुकानदाराने मराठीतून माफी मागत आपली चूक कबुल केली. मनसेकडून या दुकाना मालकाला मारहाणही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. शोभा देशपांडे यांनी दुकानाचा परवाना दाखविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांच्या विनंतीवरुन आणि मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी 16  तासांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर, पोलिसांनी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले आहे.   

मुख्यमंत्र्यांचा शोभाताईंना फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोभा देशपांडे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी, मातोश्री बंगल्यावरील आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना शोभाताईंनी उजाळा दिला. तसेच, शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभारही मानले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या सूचनाप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी रुग्णालयातून शोभा देशपांडे यांना त्यांच्या घरी सोडले. एकटी वृद्ध महिलाही लोकशाही मार्गाने काय करू शकते, हेच शोभा देशपांडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.  

टॅग्स :रामदास आठवलेमुंबईशिवसेनामराठी